5 जून आज जागतिक पर्यावरण दिन आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आज वटपौर्णिमा दोन्ही एकाच दिवशी विलक्षण योगायोग आपल्या हिंदू धर्मात पूर्वीपासून वनांचे खूप महत्व आहे. वराह पुराणापासून त्याचे दाखले आज पर्यंत पाहायला मिळतात.
वनस्पती वन आंस्थापय ध्वमा।
अर्थ - हे माणसा, तुम्ही अरण्यात वनस्पती यांची स्थापना करा.
ही शिकवण भारतीय परंपरेत दिसते.
भारतीय संस्कृती सर्व जीवमात्रांचा आदर करणारी आहे.
म्हणून आजही गावाजवळ देवराया टिकून आहेत.
प्राचीन काळापासून निसर्गातील घटकांना पूजनीय दैवी शक्ती आणून त्यांना आदरयुक्त सन्मान दिलेला पुराना ग्रंथातून वाचायला मिळतो. गंगा यमुना यांसारख्या नद्यांचे उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत जागोजागी पवित्र अशा धार्मिक स्थळांना सन्मान दिलेला आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी प्रवाहाच्या आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ऋग्वेदामध्ये वनदेवतेचे गुणगान गायले आहे. वनांपासून मानवास होणारे फायदे वर्णन केलेले आहेत. मानवाने वनसंपदेसाठी काय केले तर वनदेवता कोणकोणते लाभ देईल, याचे वर्णन आहे. ऋग्वेदात वन व्यवस्थापनाचा सर्वात जुना पुरावा आहे. वेद म्हणजे व्यवस्था. व्यवस्थापन म्हणजे उद्दिष्ट किंवा फायदा साध्य करण्यासाठी करण्यात आलेली सुनिश्चित नियोजन.
मनुष्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन त्याच्या सुप्त मनाच्या खोल कोपऱ्यात घडलेले आहे. वैदिक काळातील आपल्या पूर्वजांना हे रहस्य अनाकलनीय नव्हते. निसर्गाशी तादात्मय पावलेल्या आपल्या तत्कालीन संस्कृतीच्या मुळाशी एकच प्रयोजन होते. सर्व जीवनाच्या मूलस्तोत्राचा शोध घेणे नि त्यातच विलीन होणे. आपल्या देशातील घनदाट अरण्यातच आपल्या संस्कृतीचा जन्म झाला आणि तिथेच तिला तिची वेगवेगळी वैशिष्ट्ये प्राप्त झाली. त्यावेळी सहज प्रेरणेने आपल्या लोकांनी मनुष्यमात्राच्या प्रदीर्घकालीन अस्तित्वाला पोषक होईल अशा पद्धतीने इथल्या विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग केला. भारतीय दृष्टिकोनातून निसर्गाच्या कणाकणात ईश्वराचा वास आहे. आपल्या भारत वर्षात प्राचीन काळापासून ऋषिमुनींनी पर्यावरण समाजाचे उद्बोधन करायला प्रयत्न केला. खरेतर आपण व निसर्ग पर्यावरण वेगळे नाहीतच पण मानवाच्या अतिरेकी स्पर्धेत पोटी, अधाशीपणामुळे आपण पर्यावरणाची मानेल तशी लूटच केली आहे व करीत आहोत व त्याच्यामुळे सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्परिणामांची फळे भोगत आहोत. या भूमीवर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि त्यामुळे येथील जीवन पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. पैसा मिळवणे अधिकाधिक पैसा मिळवणे या एकाच ध्येयापुढे बाकीचे सारे काही गौण ठरले. दिवसेंदिवस गरजा वाढत गेल्या. या ह्रस्वदृष्टीच्या प्रवृत्तीतून माणसाने निसर्गसंपत्तीवर घाला घातला. वन्य जीवनाचा मोठ्याप्रमाणावर विनाश केला. जंगले उध्वस्त केली. वृक्षवल्ली आवरण ओरबाडून डोंगर उघडे केले बोडके केले परिणामतः आज भारतातील मुळ हरित भागाच्या फक्त फक्त बारा टक्के भाग हरीत आहे. त्यामुळे हळूहळू मनुष्यमात्राचे अस्तित्व धोक्यात येत आहे वारंवार येणारे पूर, महामारी, भूकंप, लाकडाची टंचाई जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनाचा तुटवडा हे सर्व निसर्गाने दाखवलेले धोक्याचे कंदील आहेत. आपल्या भोवतालची हवा शुद्ध करण्याचे कार्य झाडे करतात. पण ती झाडे नष्ट केली जात असल्याने शहरातील वातावरण प्रदूषित होत आहे आणि माणसाच्या जीवनाला धोका निर्माण होत आहे. पण माणूस मात्र नैसर्गिक संपत्तीचा विध्वंस करून अधिकाधिक आधुनिक सोयी सुविधा करून घेण्यात आणि लोकसंख्या वाढवण्यात मशगुल आहे. आधुनिक शहरी जीवनाचे दडपण वाढत असताना मनुष्य आणि निसर्ग यांच्यामधील सुसंवाद प्रस्थापित कसा करता येईल हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. पाश्चिमात्य देशांना आपली चूक कळून आली असून ते दुरुस्त करू पाहताहेत, तर आपण मात्र अजून धोक्याच्या वळनाकडेच चाललो आहोत. आपण इतके अज्ञानी की आपल्याला आपला स्वार्थ ही कळत नाही.
सृष्टी मातेने पृथ्वी घडविली, तेव्हा या भूतलावरील सर्व गोष्टी, मोठ्या कौशल्याने जुळवलेल्या एखाद्या यंत्रातल्या भागाप्रमाणे एकमेकांशी जुळणाऱ्या सुसंगत होत्या. पृथ्वीवर सर्व चराचर हे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांशी निगडित आहेत आणि चराचरांच्या या परस्पर संबंधांमध्ये मनुष्य ढवळाढवळ करु शकतो. पण आपण निसर्गातली एखादी गोष्ट नष्ट केली,की इतर सर्व गोष्टींवर त्याचा काही ना काही परिणाम होतोच. यालाच निसर्गातला समतोल म्हणतात. सबंध जगाच्या हितासाठी हा समतोल राखणं सांभाळणं फार महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ काही कारणास्तव एखाद्या जंगलात सर्वच्या सर्व झाडे तोडून टाकली आणि त्या जंगलात सहसा न ऊगवणारी दुसऱ्याच प्रकारची झाडे तिथे लावली तर तिथली निसर्गाची घडी पूर्णपणे विस्कटली जाईल. तिथले कीटक पक्षी प्राणी मरून जातील किंवा अन्नाच्या शोधात दुसरीकडे निघून जातील आणि त्यांच्या जागी दुसरे कीटक पक्षी आणि प्राणी येतीलच असं नाही. त्याच कारणामुळे झाडाखाली वाढणारी झुडपं नि रोप तिथं न वाढता त्या जागी दुसरी झुडपं नि रोप वाढू लागतील. त्याच प्रमाणे त्या जंगलात राहणाऱ्या माणसांना लागणारी नेहमीची फळं ज्या झाडापासून मिळत, ती झाडं आणि मांससाठी ज्यांची शिकार ते करीत ते प्राणीही त्या माणसांना तिथे आढळणार नाहीत.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन चरे।
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग खूप काही शिकवून जातो. आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या वृक्षवल्लींचा विनाश अजून थांबविता येईल. तो थांबविण्याच्या मोहिमेमध्ये हाय वॅाक ही संस्था आपल्या सोबत असेल. बालक आणि तरुण हे उद्याचे निर्माते आहेत, म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात राहण्यातील गुढ रहस्य, सौंदर्य आणि त्या सानिध्याची गरज जाणवून देणाऱ्या या लेखाद्वारे आमचा संदेश त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. निसर्गाविषयीचे प्रेम आणि त्यांच्या विषयाचे ज्ञान यातूनच त्यांच्या विषयीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होईल.
No comments:
Post a Comment