आज अनलॉक नंतर पुन्हा एकदा सुरवात करतोय आम्ही ( HighWalk). मनामध्ये एक धास्ती होती की कसे होईल याची. म्हणून आम्ही १० जणांचा ग्रुप तयार केला आणि जायचं ठरवलं. ह्यात आम्हाला लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पण आम्हाला ही काळजी होती की ग्रुप पण मोठा न्यायचा नाहीये आणि सर्व नियम व अटी पाळून हा ट्रेक करायचा आहे. म्हणून आम्ही १० जणांचा ग्रुप घेऊन गेलो. ट्रेक सुरु करण्याआधी आयोजकाला बऱ्याच बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यावे लागते जसे की नाश्ता व जेवण कुठे द्यायचे.सोशल डिस्टंसिन्ग कसे ठेवता येईल, फूड क्वालिटी कशी असेल, इत्यादी. कोविड मुळे आम्ही पॅकेट फूड द्यायचं ठरवलं आणि तेही हायजेनिक असेल याकडे जास्त लक्ष देण्यात आले. यात आयोजकांचा कस लागला. ही सगळी तयारी करून हायवॉक ने ठरल्या दिवशी ट्रेक नेण्याचे ठरविले.
अखेर तो दिवस आला ! सकाळी ६.३० ला आम्ही चांदणी चौकात भेटायचे ठरविले . प्रत्येकजण आपापल्या गाडीने तिथे आले. पूर्वेच्या दिशेला मस्त लालसर आकाश दिसत होते,गुलाबी थंडीचे दिवस असल्याने प्रसन्न वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट हे सगळं छान अनुभवता आले. लॉकडाऊन मध्ये पुण्यातील वायुप्रदूषण कमी झाल्यामुळे हे सुंदर असं वातावरण दिसू लागल होत. ह्यात पक्ष्याच्या आवाजामुळे तयार झालेलं नवचैतन्य घेऊन सर्वांचे फॉर्म भरून आम्ही पुढे जायला निघालो. निघताना निसर्गाची किमया डोळ्यात साठवत प्रवास सुरु होता. वळणावळणाचे रस्ते, निळेशार पाणी तर एका बाजूला हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दर्शवणाऱ्या निसर्गाला पाहून थक्क व्हायला झालं. काही वेळातच मुळशी मध्ये असलेल्या हॉटेल आशीर्वाद मध्ये आम्ही पोचलो आणि नाश्ता केला. गरम गरम चहा नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्यामध्ये दिसणारी प्लस व्हॅली च्या इथे थांबून मंडळींना व्हॅली कशी दिसते आणि कुठे जाणार आहोत ह्याची कल्पना देऊन ठरवलेल्या ठिकाणी जाण्याकरता पुढचा प्रवास सुरु झाला. काही वेळातच आम्ही सर्व ठरवलेल्या ठिकाणी पोहचून गाड्या पार्क करून सगळे एकत्रित जमलो. ह्यावेळेस मात्र आम्ही नेहमीसारखा ट्रान्सपोर्ट दिला नव्हता तेही कोविडच्या सावधगिरीमुळे . म्हणून मंडळींना स्वतःच्या गाडीने यायला सांगितले होते. ट्रेक ला जमलेल्या सर्व मंडळींना आमची ( HighWalk) ची माहिती करून दिली व त्याचबरोबर एकमेकांची माहिती सुद्धा घेतली. काही अनुभवी भटकंती करणारे तर काही अगदी नवखे तर काहींची पहिलीच वेळ होती! अशी एकमेकांची ओळख पटली. पुन्हा एकदा निसर्गाचे नियम व अटी यांची तोंड उजळणी करून झाल्यावर, खाण्यापिण्याच्या सामानाची वाटणी करून अखेरीस ट्रेकचा श्रीगणेशा केला.
ट्रेक ला सुरवात झाली आणि दाट झाडी, खळखळणारा पाण्याचा आवाज ह्याने मन प्रसन्न होत होते. पक्ष्यांचा किलबिलाट हिरवीगार झाडी यातून मार्ग काढताना एक्सपर्टस कडून झाडांची माहिती, दिसणारे पक्षी, फुलं, आणि या सगळ्याची माहिती ऐकत सगळी मंडळी खाली उतरत होती. शांत निसर्गाची सगळेजण अनुभूती घेत खालीउतरणे चालू होते. ट्रेक चालू असताना मध्येच एका झाडाच्या इथे एक मोठा कोळी (स्पायडर) पाहून सगळे थांबले. असे अनेक किटक ह्या जंगलात आहेत व त्याची माहिती सांगून पुढे कुंडाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. काही वेळातच डोक्यावर ऊन असताना आम्ही कुंडापाशी पोहचून जरा वेळ आराम केला. डोक्यावर ऊन असल्यामुळे काहींनी नदीचे शुद्ध पाणी प्यायले तर काहींनी पाण्यात पोहण्याचा आनंदही लुटला. काही निसर्गाची किमया पाहण्यात दंग झाले होते.पक्ष्यांचे विविध आवाज हे मानवाला एक प्रकारची म्युझिक थेरपी आहे. मनावरचा ताण-तणाव या थेरपी ने एकदम कमी व्हायला मदत होते पण त्याच बरोबर मन सुद्धा रिफ्रेश करून टाकते.
नदी तीन कुंडातून वाहून खाली देवकुंडात जाते. ह्याच नदीचे नाव म्हणजे कुंडलिका नदी जी ह्या व्हॅलीतुन उगम पावते. दुपारचे दिलेले पॅक फूड खाल्ल्यानंतर परतीचा प्रवास सुरु झाला. सगळ्यांनी व्हॅलीला धन्यवाद देऊन आम्ही परत यायला निघालो. जाताना उतार होता तर येताना तेवढेच चढणं ही होते. साधारण परत मधल्या मोकळ्या जागेपर्यंत येऊन आम्ही जरा विश्रांती घेतली. सगळ्यांनी आपापले अनुभव मांडले. काहींचा पहिला ट्रेक होता तर काहींचे आमच्या सोबत दुसरा किंवा तिसरा ट्रेक होता. सेफ्टी, पुरेसे अन्न, हायजिन, सेल्फ डिस्टंसिन्ग ह्या सगळ्यांचे पालन केल्यामुळे सगळे खुश होते. परत आम्ही तुमच्या ( HighWalk) सोबत नक्की येऊ असे आश्वासन देऊन सर्व मंडळी पार्क केलेल्या जागी अली. सगळ्यांचे फीडबॅक फॉर्म भरून परतीचा प्रवास सुरु झाला. अनेक आनंदी आठवणी उराशी घेऊन ! पुन्हा पुण्यात परतलो आणि छोट्याश्या भटकंतीचा गोड शेवट केला.
आयोजकांचे आऊटडोअर उपक्रम राबविणे ही अतिशय मोठी जबाबदारी असते. म्हणून प्रत्येक आयोजकांनी नियमाचे कटाक्षाने पालन करणे अनिवार्य आहे. हे अनुभवातूनच शिकायला मिळते. आपण ज्या ठिकाणी भेट देणार आहोत तिथल्या भौगोलिक, ऐतिहासिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि इतर गोष्टींबद्दल थोडक्यात माहिती असायला हवी. आणीबाणीची (Emergency) ची योजना असायला हवी. आपण स्वतः जर जागरुक राहिलो तर इतरांना पण जागरुक बनवू शकतो. आऊटडोअर मध्ये विविध स्वरूपाची भटकंती हा एक अनुभव आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे, यश आहे आणि अश्या विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या मोहिमांसाठी आम्ही सतत आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
No comments:
Post a Comment